शहीद संदीप ठोक हे नाशिकच्या खडांगळी गावचे रहिवाशी. घरात सर्वात लहान असलेला संदीप सर्वांचा लाडका होता. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आलेल्या वीरमरणामुळे अवघा परिवार शोकसागरात बुडाला आहे.
संदीपचे वडील सोमनाथ कांदा उत्पादक शेतकरी आहेत. संदीपच्या शेतात सडलेल्या कांद्याचा सडा पडलेला दिसतो. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ योगेश आणि दोन विवाहित बहिणी आहेत.
दहा वेळा लष्कराच्या भरती प्रक्रियेत अयशस्वी होऊनही संदीपने जिद्द सोडली नाही. चिकाटीने सराव करत अकराव्या प्रयत्नात तो लष्करात दाखल झाला. जुलै 2014 मध्ये संदीप लष्करात भरती झाला. बिहार रेजिमेंट 6 मध्ये तो कार्यरत होता.
शत्रूशी लढताना शहीद झालेला संदीप हा सिन्नरच्या भूमीवरचा पाचवा जवान आहे. अभिमानाची बाब म्हणजे दीड हजार लोकसंख्या असलेल्या खडांगळी गावातील 10 युवक लष्करात आहेत.
जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे महाराष्ट्राचंही अतोनात नुकसान झालं आहे. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या 17 जवानांपैकी 3 जवान महाराष्ट्रातले आहेत. लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे साताऱ्याच्या जाशी गावचे आहेत, तर शिपाई पंजाब जानराव उईके अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते.
उरीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केला असून, ठार झालेले चारही दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे असल्याचं समोर आलं आहे. तसंच या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर आणि त्याचा भाऊ रौफ असगर असल्याची माहिती समोर येते आहे.
या हल्ल्यासाठी एकूण 16 अतिरेक्यांची टोळी भारतात घुसल्याचं लष्करानं मान्य केलं. त्यामुळे अजूनही 12 अतिरेकी हे काश्मीरमध्ये मोकाट असू शकतात, अशी माहितीही लष्करानं दिली आहे.