नाशिक : चोर समजून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. राहुल जाधव असे मृत तरुणाचे नाव होते.


सिडकोच्या मोरवाडी परिसरातिल विनायक ट्रेडर्स या दुकानात आज दुपारी राहुल जाधव हा तरुण गेला होता. राहुल जाधव याच परिसरात राहणारा होता. राहुलने चोरी केली असा संशय घेऊन दुकानमालक गणेशमल राठी याने त्याला बांधून ठेवलं. तुझे अजून कोण कोण साथीदार आहेत, अशी राहुलला विचारणा करत तुफान मारहाण करायला सुरुवात केली.

काही वेळातच राहुलची प्रकृती बिघडल्याचं दिसून येताच दुकानमालकानेच राहुलला घरच्यांच्या ताब्यात दिले. मात्र त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

राहुलच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी दुकानमालक गणेशमल राठी याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या अंबड पोलीस ठाण्यात सुरु आहे.

राठी याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी राहुल याने त्याच्या दुकानात चोरी केली होती आणि आजदेखील तो चोरी करण्यासाठी आला होता म्हणून आपण त्याला मारहाण केली होती.

दरम्यान, पोलिस या घटनेचा पुढील तपास करत असून अशाप्रकारे कोणीही परस्पर कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.