नाशिक : फेसबुकवरील फेक अकाऊंटच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आपली मॅनेजर पदाची नोकरी सोडली. त्याही पुढे म्हणजे, या सर्व प्रकाराचा त्रास होऊ लागल्याने महिलेला सध्या वैद्यकीय उपचार सुद्धा घ्यावे लागत आहेत. नाशिकमधील या घटनेमुळे सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे.


नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत राहुल घोडेकर नामक व्यक्तीविरोधात सायबर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत.

पीडित महिलेला अनेक महिन्यांपासून अनोळखी नंबरवरुन फोन येत असून फेसबुकवर तुम्हीच आम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर मोबाईल नंबर देत ‘प्लीज कॉल मी’ असा मेसेज केल्याचं त्यांना सांगितले जात होतं.

या सर्व प्रकाराला कंटाळून महिलेने सदर घटनेचा शोध घेतला असता दीड वर्षांपूर्वी संगमनेरला एका फार्मा कंपनीमध्ये त्या मॅनेजरपदी नोकरीला असताना, कंपनीमध्ये राहुल घोडेकर नावाच्या एक व्यक्ती रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कामाला होता. राहुल कामात हलगर्जीपणा करत असल्याच्या अनेक तक्रारी महिलेने कंपनी व्यवस्थापनाकडे केल्या होत्या आणि त्यामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले होते.

आपल्याला कामावरुन काढून टाकल्याचा राग मनात धरुन राहुल घोडेकर हे कृत्य करत असल्याचा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे.