नाशिक : दाऊदला मुंबईत पुन्हा घातपात करायचा आहे? दाऊदच्या हल्ल्याचा कट दोन पोलिसांनी उधळला? शस्त्रास्त्राचा प्रचंड साठा दाऊदचा खास शार्पशूटर बादशाहकडून हस्तगत करण्याचा पराक्रम चांदवड पोलिसांनी केला आहे.


या साठ्यात 45 रायफल आणि रिव्हॉल्व्हर, हजारो जिवंत काडतुसं आणि लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पण या कारवाईचा घटनाक्रम या शस्त्रास्त्रांइतकाच थरारक होता...

काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नाशिकमधल्या टेहरेच्या पेट्रोल पंपावर बादशाह आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या बोलेरोमध्ये डिझेल भरलं. पण डिझेलचे 1 हजार रुपये न भरताच त्यांनी पंपावरुन पोबारा केला. याचीच तक्रार पंपमालकाने पोलिसांना केली. आणि इथेच बादशाहचा डाव फसला.

चांदवड पोलिसांच्या दोन कॉन्स्टेबलनी तातडीने चांदवडच्या टोलनाक्यावर धाव घेतली आणि ज्या लेनमध्ये बादशाहची गाडी होती, त्याच लेनच्या तोंडावर पोलिसांनी आपली गाडी आडवी लावली. त्यामुळे बादशाहला ना मागे जाता आलं, ना पुढे. नाईलाजानं बादशाह गाडीतून उतरला आणि पोलिसांनी गाडीचा ताबा घेतला. त्यावेळी पोलिस आणि बादशाहमध्ये धक्काबुक्कीही झाली.

आपण पोलिसांच्या जाळ्यात पुरते फसलो आहोत, हे लक्षात येताच बादशाहने पोलिसांना 10 हजारांचं आमिष दाखवलं. पण दोन्ही पोलिसांना बादशाहच्या वर्तनाचा संशय आला. त्याचवेळी या दोन पोलिसांच्या मदतीला पोलिसांचं चेतक पथक आलं आणि मग पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतली. तेव्हा बादशाहनं आपल्या गाडीत लपवलेलं शस्त्रास्त्रांचं घबाड उघडकीस आलं.

उत्तर प्रदेशातल्या बांदामधून बादशाहने शस्त्रास्त्रांचं दुकान लुटलं होतं. त्यात अडीच हजारांपेक्षा जास्त रायफली आणि हजारो जिवंत काडतुसं लंपास केली होती. पण शस्त्रास्त्रांचा हा साठा मुंबईत पोहोचवण्यासाठी बादशाहनं खास प्लॅनिंगही केलं होतं.

आधी बादशाहने ओएलएक्सवरुन एक गाडी विकत घेतली. त्यात विशिष्ट कप्पे करुन शस्त्रास्त्रे लपवली. प्रत्येक जिल्ह्याच्या हद्दीत जाण्याआधी तो त्या त्या जिल्ह्याची नंबरप्लेट बदलायचा. हॉटेलमधल्या मुक्कामासाठी त्याने बनावट ओळखपत्रेही तयार केली होती. इतकंच नव्हे, तर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने 12 वर्षांच्या एका मुलाला गाडीत समोर बसवलं होतं.

पण प्रश्न असा आहे, की बादशाह या शस्त्रास्त्राच्या साठ्यासह मुंबईच्या दिशेने का निघाला होता? बादशाहनं लुटलेल्या शस्त्रास्त्रांमधल्या साठ्यापैकी उर्वरित साठा कुठे आहे?

सुपाऱ्या घेऊन आतापर्यंत 60 लोकांना ठार मारणारा बादशाह सापडल्यानं राज्यातल्या एटीएस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी चांदवडमध्ये दाखल झाले आहेत. गुप्त ठिकाणी वॉर रुम तयार करुन या घटनेचा आढावा घेतला जात आहे. दाऊदला मुंबईत पुन्हा एकदा 26-11 सारखा हल्ला करायचा होता का? याचाही धांडोळा घेतला जात आहे.