जगात भ्रष्ट देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंहांची ओळख होती : दानवे
एबीपी माझा वेब टीम | 17 Feb 2017 06:18 PM (IST)
नाशिक : भ्रष्ट देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंह यांची जागतिक पातळीवर ओळख होती. परदेशात कुणी त्यांना ओळखतही नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही ओळख बदलली, त्यांच्या स्वागताला थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा विमानतळावर यायचे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे. नाशिकमधील सभेत ते बोलत होते. काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती आहे, भाजपच्या यशाने शिवसेनेचं पोट दुखतंय म्हणत त्यांनी शिवसेनेवरही टीका केली. अमित शाहांनी संपत्ती निवडणूक आयोगाच्या वेबसाईट जाहीर आहे. तुमची शोधायची कुठे?, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे, असंही दानवे म्हणाले. मराठवाड्याला पाणी सोडण्यावरुनही शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याचं दानवे म्हणाले. शिवाय 1400 कोटी रुपये खर्च करुन आम्ही 24 टीएमसी पाणी अडवलं, तर काँग्रेसने हेच काम 5 हजार कोटी रुपये खर्च करून, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊनही 8 वर्षात पूर्ण केलं नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसलाही टार्गेट केलं.