नाशिक : मनमाड जवळच्या पानेवाडी ट्रर्मिनल येथिल इंडियन ऑईलच्या बॉटलिंग प्रकल्पातील स्थानिक वाहतूकदारांनी शनिवारपासून संप पुकारल्याने येथून राज्याच्या काही भागात होणारी गॅस सिलेंडर वाहतूक ठप्प झाली आहे. कंपनीने वाहतुकीचे टेंडर काढताना वेळोवेळी त्यात बदल केले. तिसऱ्या वेळी पुन्हा टेंडर काढले त्यात स्थानिक वाहतूकदारांना डावलण्यात आल्याने वाहतूकदारांनी हा संप पुकारला आहे.
मनमाड येथून उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या गावात इंण्डेन गॅस सिलेंडरचा पुरवठा ट्रकच्या माध्यमातून होत असतो. या वाहतुकीसाठी दरवर्षी कंपनीकडून वाहतूक दराचे टेंडर मागिले जाते. त्यानुसार वाहतुकीचे दर ठरविण्यात येतात. याही वेळेस सहा टायर आणि दहा टायर गाडीचे टेंडर मागविण्यात आले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक वाहतूकदारांकडे दहा टायरची गाडी नाही. त्यातच सहा टायर गाडीच्या टेंडरमध्ये बदल करण्यात आले आहेत. अधिकारी वाहतूकदारांना अपमानास्पद वागणूक देत असल्याने आणि टेंडरमध्ये स्थानिकांना डावलत बाहेरच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देत असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या स्थानिक वाहतूकदारांनी शनिवारपासून अचानक संपाचे हत्यार उपसल्याने मनमाड येथील इंडियन ऑईल गॅस प्रकल्पातून एकही वाहतूकदाराचा ट्रक गॅस सिलेंडर घेऊन बाहेर पडला नाही.
मद्यालये सुरू झालीत देवालये का नाही? राज्यात मंदिरं सुरु करण्याची मागणी
स्थानिक वाहतूकदारांनी संप पुकारल्याने कंपनीने ज्या गॅस एजन्सीच्या मालकांकडे स्वतःच्या गाड्या आहेत. त्यांना बोलवत त्यांच्याकडून गॅस सिलेंडरची वाहतूक सुरु केलीय. स्थानिक वाहतूकदारांची काल संध्याकाळी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. मात्र, बैठकीतील चर्चा निष्फळ ठरल्याने वाहतूकदार आपल्या संपाच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे आज संपाच्या तिसऱ्या दिवशी स्थानिक वाहतूकदारांची एकही गाडी गॅस सिलेंडर भरुन बाहेर पडलेली नाही.
मनमाड येथून उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या आणि विदर्भातील काही जिल्ह्यात गॅस सिलेंडर पोहचविले जातात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सिन्नर येथून इंडियन ऑईलच्या गॅस प्रकल्पातून राज्याच्या काही भागात गॅस सिलेंडरची वाहतूक होत असते. सध्या मनमाड येथील प्रकल्पातून स्थानिक वाहतूकदारांनी संप पुकारला असला तरी त्याचा अजूनपर्यंत थेट परिणाम जाणवत नसला तरी, गॅस घेऊन येणारे बुलेट टॅकर प्रकल्पातील फिलिंग पाईंटवर खाली होऊ शकले नाही. त्यामुळे रोज होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या वाहतुकीवर मात्र त्याचा नक्कीच परिणाम झालाय.
स्थानिक वाहतूकदारांच्या संपाचा तोडगा काढण्यासाठी नाशिक येथे खासदार भारती पवार, मनमाड प्रकल्पाचे अधिकारी आणि स्थानिक वाहतूकदार यांच्यात बैठक झाली. मात्र, त्यात तोडगा निघालेला नाही.