मुंबई : राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार आजपासून पुन्हा सुरु होणार आहेत. मात्र, मंदिरं सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारनं अजूनही परवानगी दिली नसल्याने मंदिर ट्रस्टसह भाविकांमध्ये नाराजी आहे. तर भाजपनेही महाविकास आघाडीच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.


कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार बंद होते. मात्र, अनलॉक 5 मध्ये राज्य सरकारने नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली. यासाठी राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे.


राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार आजपासून सुरु होणार!


भाजपकडून विरोध
राज्यभरातील बार रेस्टॉरंट सुरू झालेत, पण अद्यापही मंदिर सुरू नाहीत, याचा भाजप अध्यात्मिक आघाडी आणि विविध देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, पुजारी साधू महंतांकडून निषेध केला जात आहे. मद्यालये सुरू झालीत देवालये का नाही, असा सवाल उपस्थित केला जात असून येत्या काळात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव आला आहे. नवरात्रीच्या कालावधीत तरी मंदिरं खुली करण्याची राज्य सरकारनं परवानगी देण्याची मागणी होत आहे. सरकारच्या नियमावलीचे पालन करण्यात येईल. मात्र, मंदिरं सुरु करण्याची परवानगी द्या अशी आग्रही मागणी धुळे येथील एकविरा देवी मंदिराच्या विश्वस्तांनी केली आहे.


हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार आजपासून सुरु
आजपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.


पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंटस् आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे एसओपीची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे रेस्टॉरंट (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अँड बेव्हरेजेस (एफ अँड बी) युनिटस्/आऊटलेट्स, हॉटेल/रिसॉर्ट/क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह) आणि बार यांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


Unlock 5.0 | मद्यालये सुरु झाली; ग्रंथालये कधी उघडणार?