नाशिक: पत्नी कौमार्य परीक्षेत नापास ठरल्यानं लग्नानंतरच्या अवघ्या ४८ तासात पतीनं तिच्याशी वैवाहिक संबंध तोडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे.


 

लग्नानंतरच्या पहिल्या रात्री जातपंचाच्या आदेशानं नववधूची कौमार्य परीक्षा घेतली गेली. पतीकडे जातपंचानी एक पांढऱ्या रंगाची बेडशीट सोपवली. दोघांच्या शारीरिक संबंधांनंतरही बेडशीटला रक्ताचा डाग न लागल्यानं पत्नी कौमार्य परीक्षेत नापास ठरल्याचा फतवा जातपंचांनी सुनावला.

 

मुलगी कौमार्य परीक्षेत अपयशी झाल्याचं निर्वाळा आधी जात पंचायतीनं दिला आणि हे लग्न रद्द ठरवलं. त्यानंतर नवऱ्यानं तिच्याशी संबंध तोडून टाकला. २२ मे रोजी हा विवाह झाला होता.

 

या सगळ्या भयावह प्रकारानंतरही बहिष्काराच्या भीतीनं मुलीच्या पालकांनी घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, अंनिस आणि जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, अॅड. रंजना गवांदे यांनी हा प्रकार उजेडात आणला.

 

जातपंचावर तात्काळ कठोर कारवाई अशी मागणी आता जोर धरते आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही पोलीस भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न करत होती. त्यामुळे धावणं, सायकल चालवणं, लांब उड्या अशा प्रकाराचा सराव ती नित्यनेमानं करत होती. मात्र शास्त्रीय कारण न तपासता अघोरी पद्धतीनं कौमार्याचा फैसला करणाऱ्या जातपंचायतीवर कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी आता जोर धरते आहे.