नाशिक: नाशिकमध्ये मुलींची खरेदी विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी दलाल महिलेसह राजस्थानचे रहिवाशी असलेल्या ३ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. या टोळीनं आतापर्यंत नाशिकमधल्या ८ ते १० मुलींची खरेदी विक्री केली असून शहरात यांचे अनेक एजंट असल्याचा संशयही व्यक्त केला जातो आहे.


 

श्रीमंत व्यक्तीशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली दलाल अल्पवयीन मुलींची फसवणूक करीत असे. अशीच फसवणूक झालेली एक मुलगी स्वत:ची सुटका करुन नाशिकमध्ये आली आणि  पंचवटी पोलीस स्थानकात या सर्व प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून राजस्थानमधल्या टोळीच्या म्होरक्यांशी संवाद साधला आणि मंगळवारी या टोळीतील काहीजणांना जेरबंद केलं.

 

गरीब कुटुंबातल्या पालकांना पैसे द्यायचे, श्रीमंत घरात मुलींच लग्न लावून देण्याच आमिष दाखवायचं आणि अल्पवयीन मुलींची परस्पर विक्री करायची अशी या टोळीची कार्यपध्दत होती. या टोळीची पाळंमुळं नाशिकमध्ये चांगलीच रुजली असून अनेक एजंट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. त्यामुळं नागरिकांना सावध राहण्याची गरज आहे.