नाशिक : अवकाळी पावसामुळे हतबल झालेल्या एका द्राक्षबागायतदार शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या द्राक्षबागायतदार शेतकऱ्याची वीजतोडणी केली गेली होती. अवकाळी पाऊस आणि वीजतोडणी यात चिंतेत होते. त्यामुळेच उर्जामंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.


नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडगाव मधील बाळासाहेब बाबूराव ठूबे या द्राक्षबागायतदार शेतकऱ्याने शनिवारी संध्याकाळी आपल्या द्राक्ष बागेतच विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली. वर्षभर दिवसरात्र मेहनत घेत, नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन त्यांनी बाग उभी केली होती. त्यांच्या दीड एकर बागेतील एक एकर द्राक्षांची काढणी बाकी होती. अशातच शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि नैराश्यात आलेल्या बाळासाहेबांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे वीजबिलाच्या थकबाकीमुळे या परिसरात विजतोडणी करण्यात आल्याने बाळासाहेबांच्या चिंतेत अधिकच भर पडल्याचं नातेवाईक सांगत आहे. बाळासाहेबांच्या आत्महत्येला ऊर्जामंत्री आणि महावितरण अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात वणी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रारही दाखल केली आहे.

शनिवार पासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्याला मोठा तडाखा बसला असून निफाड, दिंडोरी, मालेगाव आणि बागलाण तालुक्याला गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. 5 हजार 702 हेक्टर वरील पिके जमिनोदस्त झाली असून 7 हजार 521 शेतकऱ्याचं नुकसान झाल आहे. यात द्राक्ष आणि कांदा पिकांना यात सर्वाधिक फटका बसलाय.

आधीच कोरोनाचा वाढत धोका त्यानंतर लॉकडाऊनचा फटका, इंधनासोबतच शेतीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे वाढलेले भाव, मजुरांची वाढलेली मजुरी आणि व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार या सर्व गोष्टींमुळे बळीराजा हवालदील झालाय. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत सरकारने साथ देणं गरजेचं असतानाच सरकारही पाठ फिरवत असल्याने, यानंतरची पुढची पिढी शेती करणार नाही अशी भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.


दरम्यान कोरोनाचं संकट राज्य सरकारच्या नाकी नऊ आणत असतानाच राज्यावर आता अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. रविवारपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.


अवकाळी पावसामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसणार असल्याची चिन्हं आहेत. याशिवाय अनेक गावातल्या आठवडी बाजारांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. फक्त कोल्हापूर, मावळच नव्हे तर वाशिममध्येही जिल्ह्यात शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये वातावरणात गारवा पाहायला मिळत आहे.


मागील काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढत असल्याची चिन्हं होती. त्यातच आता अवकाळी पावसामुळं हवेत तात्पुरता गारवा आला आहे. हवामानात होणाऱ्या या बदलांचा आरोग्यावरही थेट परिणाम होणार आहे. त्यामुळं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात येत आहे.