नाशिकचे रहिवासी असलेले जवान संदीप ठोक उरीमधील हल्ल्यात शहीद झाले होते. त्यांचे मेहुणे ज्ञानेश्वर चव्हाणके यांनी लष्कराच्या कारवाईचं अभिनंदन केलं आहे. सरकारने कठोर निर्णय घेतल्यास पाकचे नापाक इरादे कधीच सफल होई शकणार नाहीत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यापूर्वीच ही कारवाई व्हायला हवी होती, अन्यथा आपल्या कुटुंबावरील आघात टळला असता, आणि जवान संदीप ठोक यांना जीवदान मिळालं असतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
35 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं ते उत्तमच केलं, पाकिस्तानकडून होणारे हे भ्याड हल्ले कायमचे थांबावेत, यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी, असं मतही त्यांनी मांडलं. कुटुंबातील सदस्य गमवण्याचं दुःख कधीही न भरुन येणारं आहे. संदीपच्या लग्नाच्या वरातीत नाचण्याऐवजी त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्याची वेळ आली, असं दुःखही त्यांनी व्यक्त केलं.
संदीप 28 सप्टेंबरला घरी येणार होता, हल्ल्याच्या चार-पाच दिवसांपूर्वीच त्याच्याशी बोलणं झालं होतं. त्याला घरची काळजी असल्यामुळे तो फोनवर फारशा गोष्टी सांगायचा नाही, मात्र घरी आल्यावर भरभरुन किस्से सांगायचा, तिथल्या दैनंदिन जीवनावर चर्चा करायचा, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
पाकिस्तानी घुसखोर पुन्हा भारतात येऊ नये म्हणून सरकार आणि सैन्याने कठोर निर्णय घ्यावेत, त्यांनी आपले दोन मारले तर आपण त्यांचे दोनशे मारावेत, असं आपल्या घरच्यांचं मत असल्याचंही चव्हाणकेंनी सांगितलं.
पाहा व्हिडिओ :