सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन पोलीस निलंबित, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांची कारवाई
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 04 Apr 2019 04:35 PM (IST)
सदरील घटनेप्रकरणी संशयित आरोपी महिलेला घटनास्थळावर घेऊन जात असताना गस्तीवर असलेल्या या दोन पोलिसांनी हा प्रकार बघून विचारपूस केली. मात्र चारशे रुपयांची चिरीमिरी घेऊन हे दोघे पोलीस तिथून निघून गेले, असा त्यांच्यावर आरोप होता.
नाशिक : नाशिकच्या पंचवटीतील विवाहितेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पंचवटीच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी निलंबित केले आहे. कारभारी काकुळते आणि गोरख रेहरे अशी कारवाई झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सदरील घटनेप्रकरणी संशयित आरोपी महिलेला घटनास्थळावर घेऊन जात असताना गस्तीवर असलेल्या या दोन पोलिसांनी हा प्रकार बघून विचारपूस केली. मात्र चारशे रुपयांची चिरीमिरी घेऊन हे दोघे पोलीस तिथून निघून गेले, असा त्यांच्यावर आरोप होता. सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु होती. अखेर या प्रकरणात दोषी आढळताच बुधवारी दोघांवर ही कारवाई करण्यात आली. 31 मे च्या मध्यरात्री रिक्षाचालकाने त्याच्या मित्राच्या साथीने एका विवाहितेला तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल, अशी धमकी देत बळजबरी रिक्षात बसवून घेऊन गेले होते. पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड आणि मखमलाबाद परिसरात तिच्यावर अत्याचार केले होते.