नाशिक : भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर सध्या मी भाजपमध्ये आहे, असं सूचक वक्तव्य कोकाटे यांनी केलं आहे. पक्षाने एबी फॉर्म दिला तर पक्षाकडून निवडणूक लढवेन, नाही तर वाट बघून अपक्ष दावेदारी करणार, असा निर्धार माणिकराव कोकाटे यांनी निर्धार केला आहे.


माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीने शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांच्या अडचणी वाढणार आहेत. भाजपला अजून कोकाटे यांची बंडखोरी मोडून काढण्यात यश आलेलं नाही.


शिवसेना-भाजपची युती होणार नाही हे गृहीत धरुन माणिकराव कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली होती. मात्र शिवेसना-भाजपची युती झाल्याने कोकाटे यांना मोठा धक्का बसला. माणिकराव कोकाटेंनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी प्रयत्न केले, मात्र ते अयशस्वी ठरले.


आज मुहूर्तावर मी अर्ज भरला आहे. अपक्ष आणि भाजपकडून मी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने माझ्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, त्यामुळे सध्या भाजपमध्येच आहे. 9 एप्रिलपर्यंत मला भाजपने एबी फॉर्म दिला नाही तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केलं आहे.