नाशिक : नाशिक महानगरपालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेत 'देवबंदी' केली आहे. पालिका कार्यालयातील देवांचे फोटो हटवण्याचे आदेश मुंढेंनी दिले आहेत.


महापालिकेच्या विविध कक्षात, कर्मचाऱ्यांच्या टेबलवर, भिंतीवर लावण्यात आलेले देवदेवतांचे फोटो काढण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. आयुक्तांच्या आदेशाचं पालन करत कर्मचाऱ्यांनी लागलीच अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.

महापालिकेत पारदर्शी कारभार करण्यावर भर देणाऱ्या मुंढेंनी महापालिकेच्या सर्व विभागात साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशी साफसफाई करण्यासं मुंढेंनी सांगितलं. साफसफाईच्या या मोहिमेत जुनी जळमटं, फाईल्सवरची धूळ झटकण्यात आली.

त्यानंतर देवांचे फोटे काढण्याच्या सूचना करत आचार आणि विचारांची साफसफाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुंढेनी दिली.
त्याचबरोबर महापालिकेतील इतर अधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आला.

आयुक्तांच्या या तंबीमुळे काय साध्य होणार, असा सवाल काही जणांनी उपस्थित केला आहे. एकीकडे पारदर्शकतेचा पुरस्कार करायचा आणि दुसरीकडे कामकाजाची माहिती माध्यमांना देऊ नये, अशी अधिकाऱ्यांना तंबी देत प्रसिद्धीचा झोत स्वतःवरच ठेवायचा, अशी मुंढेंची भूमिका असल्याची चर्चा महापालिकेत सुरु आहे.