नाशिक: स्टेट बँक ऑफ इंडियानं उद्योगपती विजय मल्ल्या यांचं 1200 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. त्यामुळे माझंही कर्ज याच धोरणानुसार माफ करावं, अशी मागणी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याने स्टेट बँकेकडे केली आहे. भाऊराव सिताराम सोनवणे असे या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे.


भाऊराव सोनवणे यांनी आपल्या मुलाच्या आजारपणासाठी तीन वर्षांच्या मुदतीवर 1.5 लाख रुपयांचे कर्ज स्टेट बँकेकडून काढलं होतं. पण आता हे कर्ज माफ करावे, अशी मागणी करणारे पत्र भाऊराव सोनावणे यांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापनाला लिहले आहे.

या पत्रात त्यांनी भारतीय स्टेट बॅंकेने उद्योगपती विजय मल्या यांचे 1201 कोटी रूपयांचे कर्ज माफ केले. ज्या अर्थी आपली बॅंक मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करते, त्याच प्रमाणे माझे 1.5 लाख रुपयांचे वैयक्तीक कर्ज त्याच धोरणानुसार माफ करावे, ही विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरुनही हे पत्र व्हायरल झाले असून, सरकारचा उद्योगपतींना कर्जमाफी देण्याचा निर्णय आता सामान्यांना लागु करावा अशी टिप्पणी त्यावर होत आहे.