नाशिक : कथित गोरक्षकांचा राज्यासह देशभरात धुमाकूळ सुरु असतानाच नाशिक महापालिकेतून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. नाशिक मनपामध्ये गुरुवारी एका गायीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे.


नाशिकमध्ये 13 जुलै रोजी खड्ड्यात पडल्यानंतर विजेचा धक्का लागल्याने एका गायीचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून हा खड्डा खणण्यात आला होता. या अपघातानंतर नाशिकच्या वॉर्ड नंबर 25 चे शिवसेना नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी गायीवर अंत्यसंस्कार केले. गायीच्या मृत्यूसाठी साबळे यांनी नाशिक महापालिकेला जबाबदार ठरवलं होतं.

गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत साबळे यांनी मृत गायीला श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडला. सत्ताधारी भाजपसह इतर पक्षीय नगरसेवकांनी हा प्रस्ताव स्वीकारुन गायीला श्रद्धांजली वाहिली.

सायकलपटू जसपाल सिंह विर्डी आणि ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांच्यासह गायीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला. इतकंच नाही, तर गायीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही महापौरांनी दिले. कुठल्याही पालिकेत गायीला श्रद्धांजली वाहण्याची ही देशातली पहिलीच घटना असल्याचं म्हटलं जात आहे.