नाशिक : टॉमेटो केचअप हा आजकाल बहुतेकांच्या किचनमध्ये सर्रास आढळणारा पदार्थ. त्यामुळे तुम्हीसुद्धा केचअप खात असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. नाशकात नासलेल्या टॉमेटोपासून टॉमेटो केचअप तयार होत असल्याचं समोर आलं आहे.

 
नाशिकमध्ये निकृष्ट दर्जाचं केचअप बनवणाऱ्या कंपनीवर छापा मारुन, अन्न आणि औषध विभागानं केचअपच्या दीड हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. नाशिकच्या शिंदे पळसे गावातील मंगलम फूड्सवर ही कारवाई करण्यात आली.

 
या कारखान्यात निकृष्ट दर्जाचं केचअप बनवलं जात असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीची खातरजमा करत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंगलम फूड्सवर छापा मारला.

 
या कारवाईत सडलेले 400 किलो टोमॅटोही नष्ट करण्यात आले. दरम्यान जप्त करण्यात आलेला केचअपचा नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.