नाशिक : पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढतच आहे. नाशिकमध्ये रिक्षा अंगावर घालत पोलिसाला जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी रिक्षाचालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नाशिकमध्येही गेल्या दोन दिवसांत पोलिसांवरील हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.
तपोवन चौफुलीवर नाकाबंदी कारवाई सुरु असताना पोलिस कर्माचरी घोलप यांनी रिक्षाचालकाला थांबण्यास सांगितलं. मात्र मुजोर रिक्षाचालकाने थेट घोलप यांच्या अंगावरच रिक्षा घातली. या घटनेत घोलप थोडक्यात बचावले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात रिक्षाचालक सागर नाईकसह नितीन वाडकर, रोहित नाईक, रोहित हळदणकर, ज्ञानेश्वर वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याआधी नाशिकमधल्या काठे गल्लीत पोलिस कर्मचारी भाऊसाहेब चत्तर यांना ट्रिपल सीट जाणाऱ्या व्यक्तींनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली होती. काठे गल्लीकडून द्वारका चौकात विरुद्ध दिशेने ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघांना चत्तर यांनी हटकलं होतं. याचा राग धरुन अशोक तासबंड याने चत्तर यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. अखेर चत्तर यांनी फोन करुन सहकारी कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावलं आणि तिघांना ताब्यात घेतलं.