नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला साथ देण्यासाठी नाशिकच्या विद्यार्थ्यांनी खास एटीएम तयार केलं आहे. या एटीएमचं वैशिष्ट्य म्हणजे यात कचरा टाकल्यास मोबदल्यात पैसे मिळणार आहेत.


सध्या नाशिकमध्ये या अनोख्या एटीएमची चांगलीच चर्चा सुरु आहे. पैसे काढण्यासाठी आपण एटीएममध्ये नेहमी जात असाल. मात्र आता कचरा टाकण्यासाठीही एटीएम आपल्या दारी येऊ शकतं. कारण नाशिकच्या संदीप फाऊंडेशनमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी हे आगळंवेगळं एटीएम तयार केलं आहे.

कचऱ्याच्या या एटीएमचं वैशिष्ट्य म्हणजे कचऱ्याच्या बदल्यात पैसे मिळणार आहेत. एक किलो कचऱ्याच्या मोबदल्यात 10 पॉइंट्स मिळणार. असे 100 पॉइंट्स झाले की 10 रुपये तुमच्या हाती पडणार.

यश गुप्ता, राहुल पाटील, प्रकाश सोनवणे आणि ऋषिकेश कासार या 19 वर्षांच्या चार विद्यार्थ्यांनी ही किमया साधली. या एटीएमसाठीच्या प्रोग्रामिंगची जबाबदारी यश गुप्तानं सांभाळली आहे. नाशिकमधल्या के. के. कॉलेजमध्ये सुरु असलेल्या एक्स्पोमध्ये हे एटीएम ठेवण्यात आलं आहे.

मात्र कचऱ्याच्या मोबदल्यात पैसे देणं या मध्यमवर्गीय मुलांना परवडणारं नाही. त्यामुळे सरकारनं किंवा एख्याद्या संस्थेनं पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टला महाराष्ट्रातूनच नाही तर तामिळनाडू आणि केरळमध्येही बेस्ट प्रोजेक्ट म्हणून निवडण्यात आलं आहे. तर आतापर्यंत 15 पुरस्कारांवर त्यांनी मोहोर उमटवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला साथ देण्यासाठी या विद्यार्थ्यांनी भन्नाट संकल्पना जमिनीवर उतरवली खरी, मात्र आता गरज आहे, या विद्यार्थ्यांची क्रिएटीव्हीटी प्रत्यक्ष वापरात आणण्याची.