नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात महापालिकेसह जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीला पायउतार व्हावं लागलं आहे. जिल्हा परिषदेत शिवेसनेच्या शीतल उदय सांगळे अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावित यांची निवड झाली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल सांगळे यांना 37 मतं, तर  राष्ट्रवादीच्या मंदाकिनी बनकर यांना 35 मतं मिळाली. एक सदस्य तटस्थ राहिला. उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावित यांना 37, तर भाजपच्या आत्माराम कुंभार्डे यांना 35 मतं मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडीतही एक सदस्य तटस्थ राहिला.

शिवसेना, काँग्रेस आणि माकप युतीच्या विजयानंतर राज्यमंत्री दादा भुसे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, केवळ डोक्यावर भगवा फेटाच नाही, यापुढे मनामनात भगवा विचार असेल.

जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष आणि काँग्रेसचा उपाध्यक्ष झाल्यानंतर सभागृहत बाळासाहेब ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या नावाचा जयघोष सुरु झाला.

भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस, माकपशी घरोबा केला. उद्धव ठाकरे यांच्या पवित्र्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी सेनेने नाशिकमध्ये भाजपचा युतीचा प्रस्ताव सेनेनं धुडकावून लावला होता. शिवसेनेनं भाजपासोडून सगळे राजकीय पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु केला होता. अखेर काँग्रेस आणि माकपला सोबत घेऊन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवला आहे.

भाजपनेही पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली रणनीती आखली होती. राष्ट्रवादी आणि भाजप युतीच्या गुप्त बैठक झाल्या होत्या. मात्र, गिरीश महाजन यांची मेहनत फळाला आली नाही.

नाशिक जिल्हा परिषदेतील पक्षीय संख्याबळ (एकूण जागा - 73)

शिवसेना - 25
राष्ट्रवादी - 18
भाजप - 15
काँग्रेस - 8
माकप - 3
अपक्ष आणि इतर - 4