नाशिक : नाशिकमधील शिवसेना कार्यकर्ता आणि संभाव्य उमेदवार सुरेंद्र शेजवळ यांच्या हत्येप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शिर्डीत केलेल्या कारवाईत ही अटक करण्यात आली.


शुक्रवारी 20 जानेवारीला रात्री 9.15 वाजता शेजवळ यांची हत्या झाली होती. जेलरोड त्रिवेणी पार्क परिसरात काही जणांनी पाठलाग करत शेजवळ यांची सिनेस्टाईल हत्या झाली. कोयता आणि चॉपरच्या सहाय्याने त्यांच्यावर 45 वार करण्यात आलेस त्यात शेजवळ यांचा जागीच मृत्यू झाला.

मनसेत असलेल्या शेजवळ यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेतर्फे महापालिका निवडणुकीसाठी ते संभाव्य उमेदवार होते. त्यांच्यावर एकूण 6 गुन्हे दाखल होते. शेजवळ काही काळ तुरुंगात होते.

ते जेलमध्ये असल्याने त्यांची आई पोटनिवडणूक लढली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी 15 दिवसातच मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला होता. पूर्ववैमनस्यातून शेजवळ यांचा खून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.