नाशिक : नाशिकमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. मैदानात क्रिकेट खेळताना या मुलांवर काळाने घाला घातला. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ही घटना आहे. तर दोन गायीचांही वीज पडून मृत्यू झाला आहे.


नाशिकच्या अनेक भागांत सायंकाळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटसह पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान दिंडोरी येथे सुट्टी असल्याने काही मुलं लिंबाच्या झाडाजवळ क्रिकेट खेळत होते. याच दरम्यान जोरदार वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि अचानक झाडावर वीज कोसळली. त्यावेळी झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या तिघांचा यामध्ये मृत्यू झाला. अनिल गवे, सागर गवे, रोहित गायकवाड अशी मृत तरुणांची नावे आहेत.


VIDEO | सातारा, मनमाड, पिंपरी आणि चांदवडमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ | एबीपी माझा


तर दिंडोरी तालुक्यातील शिवणई गावात आणि येवला तालुक्यातील देवठाण गावात वीज पडून दोन गायींचा मृत्यू झाला आहे. अचानक आलेल्या पावसाने कांदा, गहू, द्राक्ष या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.


ठाण्यातील बदलापूर, मुरबाड, अंबरनाथमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. याठिकाणी जोरदार वारा, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. वसईच्या कामण गावातही पावसाच्या सरी बरसल्या. धुळे शहर परिसरात  विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला.