नाशिक : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा 'आदित्य संवाद' कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडला. या कार्यक्रमात एक गंमतीशीर प्रसंग घडला. ज्यांना प्रश्न विचारायची आहे त्या तरुणांची नावे कागदावर लिहून त्याची चिट्ठी एका काचेच्या हंडीत टाकल्या होत्या. मात्र एका नावाची चिट्ठीतील नाव ऐकून आदित्य ठाकरे यांच्या तोंडून 'अरे बापरे' अशी पहिली प्रतिक्रिया आली.


'आदित्य संवाद' कार्यक्रमाच्या सुरवातीलाच निलेश राणे नावाच्या तरुणाची चिट्ठी निघाली. मात्र "निलेश राणे" हे नाव ऐकून आदित्य ठाकरे यांच्या तोंडून सहजरित्या 'अरे बापरे' ही पहिली प्रतिक्रिया आली. नाव ऐकल्यानंतर आदित्य ठाकरे यांना हसूही आवरलं नाही. आदित्य ठाकरे का हसतायेत हे लक्षात आल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.



त्यानंतर तो तरुण प्रश्न विचारण्यासाठी उभा राहिला. मात्र आदित्य ठाकरे यांना राहावलं नाही आणि त्यांनी गमतीत त्या तरुणाला तुझ्याकडे ओळखपत्र आहे का? अशी विचारणा केली.


नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे, नितेश राणे सातत्याने ठाकरे कुटुंबियांवर टीका करत असतात. अनेकदा ठाकरे कुटुंबियांकडून या टीकेला गांभिर्याने पाहिलं जात नाही आणि प्रत्युत्तरही दिलं जात नाही. त्यामुळे निलेश राणे हे नाव योगायोगाने आलं असलं तरी त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया खुप बोलकी होती.