नाशिक : पुतण्याच्या प्रेमविवाहाला मदत केल्यामुळं मुलीच्या घरच्यांकडून सुरु असलेल्या छळाला कंटाळून मुलाच्या काकानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील वांजोळे गावात घडली .


विजय पालवे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. दोन वर्षांपूर्वी विजयच्या पुतण्यानं गावातीलच दत्तू बलय्या यांच्या मुलीबरोबर प्रेमविवाह केला. या लग्नाला मदत केल्याच्या संशयावरून बलय्या कुटुंबाकडून विजयला वेळोवेळी मारहाण करणं, धमकी देणं असा प्रकार सुरु होता.

शनिवारीही त्याला मारहाण झाल्यानं कंटाळलेल्या विजयनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, विजयच्या आत्महत्येनंतर गावात निर्माण झालेल्या तणावामुळं पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी घोटी पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे.