नाशिक : केसांमधून भांग का पाडला नाही या क्षुल्लक कारणावरुन विद्यार्थिनींना छडीने मारल्याचा प्रकार नाशिकमधील शाळेत घडला आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच शिक्षण विभागानेही शाळेकडे याबाबतचा सखोल अहवाल मागितला आहे.
विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याच्या नावाखाली छडीने मारहाण करण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील पंचक गावात जनता विद्यालयामध्ये घडला आहे. अण्णासाहेब ठाकरे असं या मारहाण करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थिनींना छडीने मारहाण करत असल्याची तक्रार आहे.
यापूर्वी विद्यार्थिनींनी याबाबत तक्रार केली नाही मात्र कधी मधून भांग का पाडला नाही, तर कधी प्रार्थनेला रांगेत का उभ्या राहिला नाहीत, अशी निमित्तं शोधून संबंधित शिक्षक मारहाण करत असल्याने पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शिक्षक मद्यप्राशन करुन शाळेत येत असल्याचा आरोपही पालक आणि विद्यार्थ्यांनी केला.
पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षण विभागालाही जाग आली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. छडीने मारल्याप्रकरणी मुख्याध्यापकांनी कबुली दिली आहे, मात्र विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी छडीचा वापर केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.