नाशिक : नाशिकमध्ये एसटी बस आणि रिक्षामध्ये झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहे. मालेगाव-देवळा रोडवरील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर एसटी बस आणि रिक्षा दोन्ही वाहनं थेट विहिरीत कोसळली होती. विहिरीत पडलेली एसटी बस बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.


घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. काही वेळात पोलीस आणि बचाव पथकही तेथे दाखल झालं. मात्र दोन्ही वाहनं विहिरीत कोसळल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत होत्या. बसची मागची काच फोडून 33 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. तर आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम यांनी स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं. जखमींवर मालेगावच्या सामान्य रुग्णालय आणि देवळाच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.



प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस धुळ्यावरून कळवणच्या दिशेने जात होती. तर रिक्षा मालेगावच्या दिशेने जात होती. बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने, बस थेट समोरुन येणाऱ्या रिक्षाला धडकली. मात्र बसचा वेग जास्त असल्याने रस्त्यापासून 20 ते 25 फूड अंतरावर असलेल्या विहिरीत दोन्ही वाहनं पडली. बसमध्ये चालक, वाहकासह 46 प्रवासी होते. तर रिक्षात 9 प्रवासी होते. या अपघातात बस चालकाचाही मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बसमधील 11 आणि रिक्षातील 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.





मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपघातानंतर शोक व्यक्त केला असून जखमींना तातडीने योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांना आवश्यक तो सर्व औषधोपचार देण्याचेही त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितलं आहे. जखमींवर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व 9 डॉक्टरांची टीम यावर लक्ष ठेवून आहेत.