नाशिक : नाशिकच्या इगतपुरीतील आवळखेड गावातील एका सहा महिन्याच्या बाळाने मंगळवारी सकाळी घरात खेळता खेळता विक्सची डबी गिळली. ती गळ्यात अडकल्याने त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. मात्र नाशिक जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरित्या शर्थीचे प्रयत्न करुन शस्त्रक्रिया करत ती डबी काढून या बालकाला जीवदान दिले आहे.


इगतपुरीतील आवळखेड गावातील निलेश केकरे या महिन्याच्या बाळाने मंगळवारी सकाळी घरात खेळता खेळता विक्सची डबी गिळली आणि ती गळ्यात अडकल्याने त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता.

अत्यवस्थ अवस्थेत या चिमुरड्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती बघता डॉ. संजय गांगुर्डे यांनी तात्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. विक्सची डबी गळ्यातून बाहेर काढली आणि चिमुकल्याचा जीव वाचवला. सलग दीड तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी नाणं गिळलेल्या 5 लहान मुलांना आतापर्यंत जीवदान दिले आहे. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप नेहमीच नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांवर केला जातो मात्र याच नाशिक जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी एका 6 महिन्याच्या बाळाला एक नवीन जन्म दिल्याने कौतुक होत आहे.