नाशिक : सिन्नर तालुक्यातील शिवडे गावानंतर आता समृद्ध महामार्गाविरोधातील आंदोलनाचं लोण इतरही जिल्ह्यांमधील गावांमध्ये पोहचलं आहे. दहा जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक गावांनी समृद्धी महामार्गाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.

दहा जिल्ह्यातील 50 हून अधिक गावांमधील शेतकरी प्रतिनिधींची बैठक शनिवारी (15 एप्रिल) शिवडे गावात झाली. यावेळी ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबादसह 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कुठल्याही परिस्थितीत समृद्धी महामार्गासाठी सुपीक जमिनी द्यायच्या नाहीत, असा ठराव या बैठकीत एकमतानं करण्यात आला.

समृद्धी महामार्गविरोधी आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबादसह दहा जिल्ह्यातील शेतकरी एकत्र आले आहेत. मुंबईहून औरंगाबादला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गासह तीन मोठे महामार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा विकास करण्याऐवजी हजारो शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या समृद्धी महामार्गाचा घाट का घातला जातो आहे, असा सवाल या समितीनं केला आहे.

26 एप्रिलला शहापूर येथे या दहाही जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन जनआंदोलन उभं करणार आहेत. त्याचं नियोजनही या बैठकीत करण्यात आलं. या बैठकीच्या दरम्यान राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

ग्राऊंड रिपोर्ट : ‘समृद्धी’ला विरोध करणाऱ्या शिवडे गावाची नेमकी व्यथा काय?