नाशिक : नांदगाव विधानसभेसाठी निवडणूक लढवत असलेल्या समीर भुजबळ यांच्या सभेत गोंधळ झाल्याचं दिसून आलं. नांदगाव विधानसभेतील साकूर गावात ही घटना घडली. विरोधी उमेदवार सुहास कांदे यांच्यावर टीका करू नका असं सांगत एका व्यक्तीने समीर भुजबळांच्या सभेत गोंधळ घातला. नंतर भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याऱ्या व्यक्तीला बाहेर काढलं. नांदगाव विधानसभेत आमदार सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ अशी लढत असणार आहे.  


नांदगावमधील साकूर गावात समीर भुजबळांची सभा सुरू होती. त्यावेळी समीर भुजबळांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर टीका सुरू केली. त्यावेळी एका कार्यकर्त्याने सुहास कांदे यांच्यावर टीका करू नका म्हणून आक्रमक पवित्रा घेतला. सुहास कांदेंवर टीका करायची नाही असं म्हणत कार्यकर्ता आक्रमक झाला. मात्र समीर भुजबळ यांनी सभा सुरूच ठेवली. त्यावेळी त्या कार्यकर्त्यांने गोंधळ घातल्याचं दिसून आलं. गोंधळ घालणाऱ्या कर्यकर्त्याला बाजूला केल्यानंतर साकूर गावातील लोकांकडून समीर भुजबळांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. 


नांदगावमध्ये तिरंगी लढत


पंकज भुजबळ यांना विधानपरिषदेवर आमदारकी मिळाल्याने महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांचा मार्ग मोकळा झाला असे दिसत होते. मात्र छगन भुजबळ यांचे पुतणे  समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सुहास कांदे यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने गणेश धात्रक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजल्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भयमुक्त नांदगाव अशी टॅगलाईन घेऊन निवडणूक लढवत असल्याची घोषणा समीर भुजबळ यांनी केली. यानंतर समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. समीर भुजबळ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीच्या नेत्यांकडून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले. मात्र समीर भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही.


ही बातमी वाचा :