नाशिक : रोईंग म्हणजेच नौकानयन क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकमध्ये भारताचं नेतृत्व करणाऱ्या दत्तू भोकनळनं बारावीचा पहिला पेपर दिला. मंगळवारपासून राज्यभरात बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली.


नाशिकच्या तळगाव-रोही मध्ये राहणाऱ्या दत्तूला लासलगावच्या दत्ताजी पाटील हायस्कूलमध्ये परीक्षा केंद्र आलं आहे. सहा वर्षांपूर्वी दहावीनंतर दत्तू लष्करात दाखल झाला. त्यानंतर त्यानं रोईंग खेळात प्राविण्य मिळवलं.

रोईंगमध्ये कारकीर्द सुरु झाल्यानंतर त्याला पुढील शिक्षण घेणं शक्य झालं नाही. अखेर सहा वर्षांच्या विरामानंतर दत्तू बारावीची परीक्षा देत आहे. विशेष म्हणजे चारच दिवसांपूर्वी दत्तूनं पुणे नौकानयन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे.

रोईंगपटू दत्तू भोकनळची गावात जंगी मिरवणूक


ऑलिम्पिकमध्ये दत्तूनं रोईंगच्या सिंगल स्कल्स प्रकारात गटात 6 मिनिटं आणि 54.96 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून तेरावं स्थान मिळवलं होतं. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा दत्तू महाराष्ट्रातला पहिलाच रोईंगपटू ठरला.

मूळचा नाशिक जिल्हयातील चांदवड तालुक्यातील तळेगाव-रोही या छोट्याशा गावचा रहिवासी असलेल्या दत्तूनं लष्करात दाखल झाल्यावर रोईंगला सुरूवात केली होती. तळेगाव रोहीसारख्या दुष्काळी गावात पाण्याची उपलब्धता नसताना दत्तू भोकनाळ याने रोईंगची निवड केली आणि त्यात प्राविण्य मिळवत ऑलिम्पिक गाठलं. त्याच्या कामगिरीचा गावकऱ्यांना अभिमान आहे.