नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आता जॅमर बसवण्याचं काम सुरु झालं आहे. कारागृहातील मोबाईल वापराला आळा बसावा यासाठी कारागृहात 27 जॅमर बसवले जात असून, आजपासून जॅमर बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.


सध्या कारागृहात 20 जॅमर बसवले आहेत. तरीही वारंवार मोबाईल सापडण्याच्या घटना या समोर येत असल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

डिसेंबर महिन्यात 15 दिवसात तब्बल 40 मोबाईल आणि 2 सिमकार्ड बेवारसपणे कारागृहात मिळून आले होते. यानंतर कैद्यांची विशेष पथकामार्फत झडती घेण्यात आली होती.

कारागृहाची सुरक्षा धोक्यात आल्याने 12 कैद्यांना राज्यातील इतर कारागृहात हलवण्यात आले होते, तर 3 तुरुंगाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

एकंदरीतच आता जॅमर बसवल्याने कैदयांच्या छुप्या वापरासोबतच तुरुंगातील कर्मचारी आणि अधिकारी या सर्वांनाच मोबाईल वापरावर बंदी येणार आहे.