नाशिक : महाराष्ट्र विकास आघाडी सरकार लवकरच 60 ते 70 हजार रिक्त पदांसाठी टप्प्याटप्प्याने मेगाभरती करणार आहे. सुरुवातील पोलीस दलातील आठ हजार पदं भरणार आहोत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कादवा इंग्लिश मीडियम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.


शिक्षण, ग्रामविकास, गृह, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास, कृषी, पशु व संवर्धन आणि आरोग्य विभागात अनेक पदं रिक्त आहेत. फडणवीस सरकारने मेगाभरती करण्याचं आश्वासन दिलं पण ती रखडली. अखेर आता महाराष्ट्र विकास आघाडी मेगाभरती करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. सरकारच्या या निर्णयामुळे बेरोजगार तरुणांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील तरुणांना सरकारचं न्यू ईयर गिफ्ट, हजारो पदांसाठी भरती

60-70 हजार पदांची टप्प्याटप्प्याने भरती
विविध विभागांमधील मेगाभरतीविषयी अजित पवार यांनी सांगितलं की, "आम्ही सरकारमधील बऱ्याचशा जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा आठ हजार पोलिसांची भरती घेतोय. ती भरती झाल्यानंतर वेगवेगळ्या विभागांमध्ये जी काही कमतरता आहे, मग ती शिक्षक, कृषीसेवक, ग्रामसेवक, किंवा परिचारिकांची असो, त्याचा आम्ही आढावा घेतोय. जवळपास 60-70 हजार पदांची भरती टप्प्याटप्प्याने करण्याचं काम या सरकारला करावं लागणार आहे. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे."



फडणवीस यांच्यासोबतच्या शपथविधीची आठवण
याच कार्यक्रमात बोलताना अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या ऐतिहासिक शपथविधीची आठवण झाली. ते म्हणाले की, "माझ्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठून यावं लागलं, त्यासाठी माफ करा. परंतु सकाळी दहा वाजल्यापासून नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबारमध्ये माझ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आहेत. त्यामुळे मला हीच वेळ देता येणं शक्य होतं. मला आमदारसाहेब बोलत होते, काही जण चर्चा करत होते, इतक्या लवकर येतील का? तर दुसरा बोलला की अरे येतील, ते सकाळी उठूनच शपथविधी करतात. गंमतीचा भाग जाऊ द्या."