नाशिक : नाशिकमधील संदीप हॉटेलमध्ये उल्हासनगरमधल्या महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. हा प्रकार 22 सप्टेंबरला झाला होता.
याप्रकरणी महिलेनं मुंबई नाका पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. नवरात्रीमध्ये नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालीका देवीच्या दर्शन घेऊन पीडित महिला शिर्डीला जाणार होती.
रात्री उशीर झाला म्हणून ही महिला मुंबई नाक्याच्या संदीप हॉटेलमध्ये मुक्कामी राहिली. मात्र, मध्यरात्री दीडच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीनं तिच्या खोलीत घुसला आणि महिलेच्या 8 महिन्याच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबत पीडित महिलेनं पोलिसात तक्रार केली आहे.
दरम्यान, या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच त्या दिवशी मुक्कामी असलेल्या इतर ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची देखील तपसाणी सुरु आहे.