नाशिक : कैद्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात घडली. सोमनाथ दगडू शेंडे असं या 50 वर्षीय कैद्याचं नाव आहे. पँटच्या नाड्याने शौचालयात गळफास घेण्याचा त्याने प्रयत्न केल्याची माहिती आहे.


सोमनाथ शेंडे याने काल रात्री पावणे 8 च्या सुमारास बराक क्रमांक 4 च्या शौचालयात जाऊन गळफास घेतला होता. त्याच वेळी शिक्षाबंदी हुसेन मोहम्मद पटेल हा शौचालयात गेला असता त्याने हा प्रकार बघितला. इतर कैद्यांना आणि कर्मचाऱ्यांना बोलावून सोमनाथला खाली उतरवण्यात आलं.

दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न का केला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र तुरुंगातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ शेंडे याचं मानसिक स्वास्थ बिघडलेलं आहे. तो नेहमी तणावात असतो. याच तणावातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज आहे.