मूळचा सांगलीचा, घरफोड्या नाशिकमध्ये, अन् नेपाळमध्ये रिसॉर्ट
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 21 Feb 2018 03:56 PM (IST)
नेपाळच्या पोखरा येथे त्याच्या मालकीचे दोन मोठे हॉटेल्स असून एक रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने चोरी करण्यासाठी तो नाशिकमध्ये येताच, नाशिक पोलिसांनी त्याला सीबीएस परिसरातून ताब्यात घेतले आहे.
नाशिक : नाशिकमध्ये घरफोड्या करुन नेपाळमध्ये स्थायिक झालेल्या गणेश भंडारे या एका श्रीमंत चोराच्या मुसक्या आवळण्यात नाशिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मूळचा सांगलीचा असलेल्या गणेशने नेपाळमधील एका महिलेशी लग्न केले असून, चोरी करण्यासाठी गणेश महाराष्ट्रात येतो आणि चोरीच्या पैशातून तो रिसॉर्ट उभारत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. नेपाळच्या पोखरा येथे त्याच्या मालकीचे दोन मोठे हॉटेल्स असून एक रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने चोरी करण्यासाठी तो नाशिकमध्ये येताच, नाशिक पोलिसांनी त्याला सीबीएस परिसरातून ताब्यात घेतले आहे. 30 ऑक्टोबर 2016 रोजी नाशिकच्या टागोरनगरमध्ये घरफोडी करुन गणेश फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र तो नेपाळमध्ये लपून बसल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. राज्य गुन्हे अन्वेषन विभाग पुणे यांच्यामार्फत गणेशला प्रत्यार्पण करण्यासाठी इंटरलपोलकडे प्रस्ताव देखील सादर करण्यात आला होता. गणेशला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता, 3 घरफोडीच्या गुन्ह्यात चोरलेला आणि मुंबईमधील एका सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करणाऱ्या दीपक पोखरकर या व्यावसायिकाला विक्री केलेला 13 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामध्ये 547 ग्रॅम सोन्याचा समावेश असून दीपकला देखील अटक करण्यात आली आहे. गणेश भंडारेच्या इतर साथीदारांचा पोलीस सध्या शोध घेत असून, त्याने अशाच प्रकारे चोरीच्या पैशातून कुठे कुठे आणि किती संपत्ती गोळा केली आहे, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.