नाशिक : दोन दिवसांपूर्वी पिकअप गाडीने दिलेल्या धडकेत जखमी असलेल्या दोन पोलिसांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. नंदू जाधव असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 2 एप्रिलला झालेल्या अपघातात नंदू जाधव जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
पेठरोडवर हॉटेल राऊ चौफुलीवर भरधाव वेगात आलेल्या पिकअप गाडीने गस्तीवर असलेल्या म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या दोन बिट मार्शलला धडक दिली होती. या धडकेत पोलीस कर्मचारी नंदू जाधव आणि राजेश लोखंडे गंभीर जखमी झाले होते. हा अपघात एवढा भीषण होता की पोलिसांच्या दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला होता.
अपघातात जखमी झालेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर नाशिकमधील मुंबई नाका परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र नंदू जाधव यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या अपघातात पिकअप गाडीचा ड्रायव्हर देखील जखमी झाला होता. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.