नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काल नाशिकमधील सभेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर त्यांच्या खास शैलीत टीकास्त्र सोडलं. भाजपाध्यक्ष अमित शाह यांची मिमिक्री करत गुजरातमधील शाह आणि उद्धव ठाकरेंच्या गळा भेटीवरही भुजबळांनी टीका केली. शिवाय पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या 'मै भी चौकीदार' या मोहिमेचा खरपूस समाचार घेतला.

Continues below advertisement


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' असं म्हटलं होतं, पण कोण चोर आहे? नाव घेतलं नाही. मात्र टोपी फिट बसली आहे, अशा शब्दात छगन भुजबळांनी मोदींच्या 'मै भी चौकीदार मोहिमेची खिल्ली उडवली. लोक सांगतात मी डॉक्टर आहे, इंजीनियर आहे आणि मोदी म्हणतात मी चौकीदार आहे. तुम्ही चौकीदार आहात तर मग चौकीदार घेतो तेवढा पगार घ्या आणि घरी बसा, असा सल्लाही भुजबळांनी दिला.



उद्धव ठाकरेंनी अमित शाहांसाठी त्यांच्या गांधीनगर येथील प्रचाराच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावरुन छगन भुजबळांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. आमची जात वाघाची म्हणे मग कशाला मुका घ्यायला गेले, असा टोला भुजबळांनी लगावला.


मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीवरही भुजबळांनी प्रश्न उपस्थित केले. नोटबंदीनंतर सगळा काळा पैसा गुजरातला अमित शहाच्या पतसंस्थेत गेले, असा आरोप भुजबळांनी केला. पंतप्रधान मोदी परत सत्तेत आले तर यापुढे लोकसभा निवडणुका होणार नाहीत, त्यांना हिटलरशाही हवी आहे, अशी टीका भुजबळांनी केली.


भुजबळ तुम्ही जामिनावर आहात विसरु नका, असा इशारा मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्याला उत्तर देताना भुजबळांनी म्हटलं की, मी जेव्हा मुंबईचा महापौर आणि आमदार होतो, त्यावेळी तुम्ही तुम्ही हाफ पँट घालून शाळेत जात होते हे विसरु नका.