नाशिक : एक वर्षापूर्वी चोरीला गेलेलं 35 तोळे सोनं आणि 15 किलो चांदी हस्तगत करण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे. मात्र इतकी मोठी चोरी होऊनही फिर्यादीने एक वर्ष तक्रार का दाखल केली नाही आणि एरव्ही वर्षानुवर्षे मुद्देमाल न मिळणाऱ्या नाशिक पोलिसांना तक्रार दाखल झाल्यावर अवघ्या 12 तासात मुद्देमालासह चोर मिळून आल्याने ही कारवाई वेगळ्याच चर्चेचा विषय ठरली आहे.

मुंबई नाका परिसरात राहणाऱ्या प्रतिष्ठित कुटुंबातील प्रतिभा चांडक यांचं 35 तोळं सोनं आणि 15 किलो चांदी साधारण एक वर्षांपूर्वी चोरीला गेलं होतं. प्रतिष्ठेपायी चांडक यांनी वर्षभर पोलिसात तक्रार केली नाही. मात्र 9 नोव्हेंबरला त्यांनी मुंबई नाका पोलिसात चोरीची तक्रार केली.

एका वर्षाने दाखल झालेल्या या तक्रारीची तत्परतेने दखल नाशिक पोलिसांनी संशयावरुन खासगी कार चालक नितीन यादव वालझाडेला सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथून अटक केलं.

नितीनकडून एक वर्षांपूर्वी चोरीला गेलेला मुद्देमालही हस्तगत केला हे विशेष. नितीन हा उच्चशिक्षित युवक आहे.

आता हे सगळं इतकं जलद घडल्याने या तपास आणि चोरीबद्दलच अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमकं आताच तक्रार का दाखल झाली. पोलिसांनी अचूक चोर कसा शोधला आणि एक वर्षाने तक्रार येऊनही 12 तासात मुद्देमाल मिळवून देणाऱ्या नाशिक पोलिसांचं कौतुक करावं की ते  सर्वसामान्यांना असा न्याय का मिळवून देत नाही म्हणून दोष द्यावा असा प्रश्न आहे.