मनमाड : गेल्या काही दिवसांपासून चांगले दर मिळत असलेल्या शेतकऱ्यांच्या कांदाकडे चोरट्यांनी आपली नजर वळवली आहे. कारण, नाशिक जिल्ह्यातल्या अनकाईमधील एका शेतकऱ्याच्या शेतातून 14 क्विंटल कांदा चोरट्यांनी लंपास केला आहे.

सध्याच्या बाजारभावाप्रमाणं या कांद्याची साधारण किंमत 40 ते 45 हजार रुपये इतकी आहे.

धर्मा डामले यांची मनमाड-येवला या मार्गालगत असलेल्या आपल्या शेतात लाल कांद्याची लागवडी केली होती. तयार झालेला कांदा त्यांनी शेतात काढून ठेवला होता. मात्र, गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी या 14 क्विंटल कांद्यावर डल्ला मारला.

विशेष म्हणजे, धर्मा डामले हे होमगार्ड पथकात सेवाही देतात. कांदा चोरीला गेल्याने धर्मा डामले यांनी मनमाड पोलिसात काल तक्रार केली आहे.

दरम्यान, सध्या कांद्याची सर्वच बाजार समितीमध्ये चांगली आवक असून, मागणी वाढल्याने लाल कांद्याला सध्या 3500 रुपये क्विंटलच्या पुढे भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.