नाशिक: नाशिकमध्ये अजय बोरस्ते आणि विनायक पांडे राडाप्रकरणी 6 शिवसेना कार्यकर्त्यांवर शस्त्रबंदी कायदा भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा आणि वहिनीला तिकीट मिळावं यासाठी माजी महापैर विनायक पांडे यांनी काल शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्तेंना मारहाण केल्याचा आरोप आहे.
विनायक पांडे यांचा मुलगा ऋतुराज आणि वहिनी कल्पना यांना भाजपनं लगेच उमेदवारी दिली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरून विनायक पांडे आज मातोश्रीवर येणार आहेत. त्यामुळे मातोश्रीवर आज नेमकं काय घडतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण:
नाशकातल्या चांडक सर्कलवरचं एसएसके हॉटेल काल सकाळपासून इथं शिवसेना कार्यकर्त्यांची लगबग होती. कारण महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करत होते.
दुपारी बाराच्या सुमारास शिवसेना नेते आणि माजी महापौर विनायक पांडे तिथं पोहोचले. त्यांनी मुलगा ऋतुराज आणि वहिनी कल्पना यांच्यासाठी तिकीट मागितलं. पण एका घरात किती तिकीटं द्यायची? असा सवाल करत बोरस्तेंनी तिकीट नाकारलं. त्याऐवजी कैलास चुंबळेंना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पांडे समर्थकांनी बोरस्तेंना मारहाण केल्याचं कळतं आहे.
पण महाभारत नेमकं इथूनच सुरु झालं. कारण विनायक पांडे यांनी एसएसके हॉटेलातून थेट भाजपचं कार्यालय गाठलं. तिथं गिरीश महाजन हजर होतेच. त्यांनी ऋतुराज पांडे आणि कल्पना पांडेंचं स्वागत केलं. अवघ्या अर्ध्या तासात शिवसैनिक असलेलं पांडे कुटुंब हातात कमळाचं फूल हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलं.
गिरीश महाजनांच्या हस्ते ऋतुराज पांडेला वॉर्ड क्रमांत 13 मधून तर कल्पना पांडे यांना वॉर्ड क्रमांक 24 मधून उमेदवारी देण्यात आली.
संबंधित बाातम्या:
नाशिकमध्ये तिकीट वाटपावरुन शिवसेनेच्या दोन गटात राडा