नाशिक : नाशकातील एका उपसरपंचासमोर गावकीतल्या राजकारणामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. अविश्वास ठरावामुळे लग्नाच्या दिवशीच विलास जोशी कात्रीत सापडले आहेत.
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कुर्णोली गावच्या उपसरपंचांसमोर पेच प्रसंग उभा राहिला आहे. विलास जोशी या तरुण उपसरपंचावर त्यांच्याच सहकाऱ्यांनी अविश्वास ठराव आणला. त्यावर मतदान घेण्यासाठी 12 मार्चला विशेष सभा बोलवण्यात आली. त्याच दिवशी जोशी यांचं लग्न आहे.
पाहुण्यांचं स्वागत करायचं, लग्नाचं स्वप्न रंगवायचं, की अविश्वास ठराव टाळण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची मनधरणी करायची असा प्रश्न उभा ठाकला आहे. एकीकडे लग्नाची खरेदी, निमंत्रण पत्रिका वाटण्याची लगबग असतानाच कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आणि अविश्वासाची टांगती तलवार दूर करायची यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
वैयक्तिक कारणामुळे सदस्यांनी आपल्या विरोधात कटकारस्थान रचल्याचा आरोप जोशी करत आहेत. आयुष्यातील कठीण प्रसंग आणि लग्न सोहळा असे दोन्ही क्षण एकाच दिवशी वाट्याला आल्यानं या विवाह सोहळ्याची जिल्ह्यात खुमासदार चर्चा आहे.