नाशिक : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नाशकातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात जात पंचायतीच्या जाचाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा गुन्हा दाखल करु नये, म्हणून जात पंचायातीने कुटुंबावर दबाव टाकत वाळीत टाकलं. आरोपीने पीडित तरुणीबरोबर लग्न करण्याबाबत दिलेलं लेखी आश्वासन पाळण्यास नकार दिल्यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.


आपण आज जागतिक महिला दिन साजरा करत आहोत, मात्र त्याच दिवशी समाजाचा दुसरा चेहरा दाखवणारी घटना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधल्या राजेवाडी गावात घडली.

23 जानेवारी 2018 रोजी राजेवाडी गावातील दिनकर शिवा येले या 19 वर्षीय तरुणाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर गुन्ह्याची वाच्यता करु नये, म्हणून तरुणीच्या कुटुंबीयांना धमकवण्यात आलं. त्यांना जमिनीचं आमिष दाखवण्यात आलं.

विशेष म्हणजे आरोपीने बलात्काराचा गुन्हा केल्याचं बाँड पेपरवर कबूल करत आपल्या कृत्याचा एक प्रकारे सौदाच केला. अल्पवयीन तरुणी ज्यावेळी सज्ञान होईल, त्यावेळी तिच्याशी विवाह करण्याचं त्याने लेखी दिलं. विवाह न केल्यास तिच्या नावावर पाच एकर जमीन देण्याचं हमीपत्रही त्याने नोटरी करुन पंचांसमक्ष लिहून दिलं.

या घटनेला दीड महिना झाल्यावर आरोपीच्या कुटुंबीयांनी पीडितेला दिलेलं आश्वासन तोडलं. ज्या पेपरवर लेखी दिलं, ते पेपर फाडून टाकण्याची जबरदस्ती केली. ज्यावेळी मुलीच्या वडिलांनी पेपर फाडण्यास नकार दिला, तेव्हा जात पंचायतीने वाळीत टाकलं, असा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला.

पीडित मुलीचं कुटुंबीय ठाकूर समाजाचं आहे. त्यांना लग्नकार्यातही येऊ दिलं जात नाही. त्यांच्याशी कोणी संबंधही ठेवत नसल्याचं वास्तव उघडकीस आलं.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र जात पंचायतीला मोकळं सोडण्यात आलं आहे. त्यामुळे जात पंचायतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. त्यामुळे तपासात जे जे पुढे येईल त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

एकीकडे महिला दिन साजरा होत असताना दुसरीकडे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागणे, एखाद्या मुलीवरील अत्याचाराचा बाँड पेपरवर सौदा करणे, त्याला पंचांची साथ मिळणे आणि या विरोधात आवाज उठवणाऱ्या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करणे, हे सारंच धक्कादायक आहे. त्यामुळे पीडित मुलीला कसा न्याय मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.