नाशिक पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांना 'आयर्नमॅन' किताब
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 28 Aug 2018 12:09 AM (IST)
डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी केवळ 15 तास आणि 13 मिनिटांमध्येच आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत अभिमानाने भारताचा तिरंगा फडकावला.
नाशिक : युरोप खंडातील अतिशय खडतर समजली जाणारी 'आयर्नमॅन' स्पर्धा नाशिकचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी पूर्ण करत नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. आयर्नमॅन किताब पटकवण्यासाठी चार किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर सायकलिंग या सर्व स्पर्धा 16 तासांच्या कालावधीत पूर्ण करायच्या असतात. डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी केवळ 15 तास आणि 13 मिनिटांमध्येच हे टास्क पूर्ण करत अभिमानाने भारताचा तिरंगा फडकावला. विशेष म्हणजे वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अथक सराव आणि परिश्रम घेत हे लक्ष्य पूर्ण केलं. फ्रान्समधील विचीमध्ये रविवारी पार पडलेली ही स्पर्धा इंग्लंडच्या प्रमाणवेळेनुसार पहाटे पाच वाजता सुरु होऊन रात्री दहा वाजता संपली. रवींद्रकुमार सिंघल यांच्यावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून तीन सप्टेंबरला नाशिकमध्ये येताच त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे. यापूर्वी 2017 साली विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी ही स्पर्धा पूर्ण केली होती. तर मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमणनेही हे शिवधनुष्य 2015 मध्ये यशस्वीरित्या पेललं होतं.