नाशिक : नाशिककरांनो दुचाकीवर बसताना तुम्ही जर हेल्मेट घातले नाही तर तुम्हाला आता चांगलेच महागात पडणार आहे. कारण हेल्मेट नसेल तर पोलिसांकडून एक अनोखी शिक्षा दिली जात असून पोलिसांची ही कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. त्यामुळे हेल्मेटच्या कंटाळा करत असाल तर तुम्हाला दोन तास समुपदेशन केंद्रात जाऊन बसावं लागेल.
हेल्मेटविना दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, हेल्मेट नसेल तर पेट्रोल नाही. असे अनेक प्रयोग हेल्मेटसक्तीसाठी नाशिक पोलिसांनी केले. मात्र त्याचा फारसा फायदा होताना दिसला नाही. नाशिक शहरात जानेवारी 2017 ते जून 2021 या साडेचार वर्षांच्या काळात 782 अपघातांमध्ये 467 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात 394 दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते आणि हिच परिस्थिती बघता वारंवार आवाहन करून देखील नाशिककर हेल्मेटचा वापर करत नसल्याने दिसून येत होते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत नाशिक शहरात हेल्मेटसक्ती राबवली जात असून हेल्मेट असेल तरच दुचाकीचालकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जात आहे. मात्र ही मोहिम राबवून देखील जवळपास 40 टक्के नागरिक हेल्मेट घालत नसल्याने पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी आजपासून एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे.
यानुसार शहरात नाकाबंदी करण्यात येत असून हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या जात आहेत. त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवत मुंबई नाक्यावरील ट्राफिक पार्कमध्ये नेऊन त्यांचे दोन तास समुदपेशन केले जात आहे. मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट बंधनकारक आहे. समुपदेशन प्रमाणपत्र दाखवल्यावरच दुचाकीस्वाराचे वाहन त्यांच्या ताब्यात दिले जात आहे. सोमवारपासून हेल्मेट नाही घातले तर लायसन्स देखील रद्द करण्यात येणार आहे.
या नागरिकांना समुपदेशन केंद्रावर नेले जाऊन तिथे त्यांचे दोन तास समुपदेशन केले जाते. त्यांना व्हिडीओ क्लिप मार्फत तसेच तज्ञांकडून मार्गदर्शन करत हेल्मेटचे महत्व पटवून दिले जाते. तसेच वाहतुकीचे नियमही समजावून सांगितले जातात. पोलिसांनी आता ही मोहीम हाती तर घेतली आहे मात्र ती कितपत यशस्वी होते, हे आगामी काळात बघणं महत्वच ठरणार आहे.