नाशिक : शहरात अपहरणाचं थरारनाट्य रंगल होतं. या अपहरणाचा नाशिक पोलिसात गुन्हा दाखल झाला. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते अहमदाबादचे पोलीस होते, ज्याचे अपहरण झाले तो आसाराम बापू आश्रमातील सेवक आणि 12 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी होता. या अपहरणाने नाशिक पोलिसांची झोप उडाली होती. तपासाअंती ज्यांचा शोध घेत होतो ते पोलीस आणि ज्याच्यासाठी पथकं रवाना केली तो गुन्हेगार असल्याचं लक्षात आल्यावर डोक्याला हात मारून घेण्याची वेळ नाशिक पोलिसनावर आली. नाशिकच्या आसाराम बापू आश्रमातील गोशाळेचा सेवक संजीव किशनकिशोर वैद्य. हा गेल्या 12 वर्षांपासून पोलिसांच्या दप्तरी फरार होता. गुजरात मधील साबरमतीला एकावर प्राणघातक हल्ला झाला होता. 2009 ला ही घटना घडली होती.


जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी संजीव वैद्य तेव्हापासून पोलिसांच्या नजरा चुकवत एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. मूळचा उत्तर प्रदेशचा असणारा संजीव वैद्य. एक दीड वर्षांपूर्वी नाशिकच्या आसाराम बापू आश्रमात आल्याचा दावा आश्रमातील त्याचे सहकारी करत आहेत, त्याच्याकडे गोशाळेची जबाबदारी देण्यात आली. दर महिन्याप्रमाणे दोन दिवसांपूर्वी तो पंचवटीतील नागसेठिया पशु खाद्य दुकानात गायींसाठी चारा आणि खाद्य घेण्यासाठी गेला. पैसे अपूर्ण होते म्हणून त्याने आपल्या जोडीदाराला बोलावले, जोडीदार पोहचण्याआधीच तीनचारजण ग्रे रंगाच्या इनोव्हा कार मधून आलेत आणि त्यांनी संजीव वैद्यला गाडीत कोंबले आणि पसार झाले. 


हा घटनाक्रम दुकानदारासह परिसरातील नागरिकांनी बघितला. भरदिवसा अपहरण झाल्यानं सारेच भयभीत झाले, अज्ञात व्यक्तींनी संजीव वैद्यचं अपहरण केल्याचा पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला. नाशिक पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना तपास सुरू केला, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला संपूर्ण रात्र पोलिसांनी तपास चालूच ठेवला, नाशिक-मुंबई महामार्गावरील घोटी टोलनाका, नाशिक, पुणे, महामार्गावरील शिंदे टोल नाकापर्यंत शोध घेतला. तपासाची चक्र फिरवली असता अपहरणकर्ते दुसरे तिसरे कोणी नसून अहमदाबादच्या क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचं निष्पन्न झाले. 12 वर्षांपासून राजरोसपणे फिरणाऱ्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.


"गेल्या काही दिवसांपासून संजीव किशनकिशोर वैद्य पंचवटीतील दुकानात पशु खाद्य घेण्यासाठी येत होता. अहमदाबाद पोलीस त्याच्या मागावर होते, त्यांनी सापळा रचून संजीव वैद्यला ताब्यात घेतले, तिथूनच थरारक अपहरण नाट्याला सुरुवात झाली. नागसेठीया दुकानाचे संचालक सुभाष नागसेठिया यांच्यासह परिसरातील इतरांनी हा थरार प्रत्यक्ष बघितला. आसाराम बापू आश्रमात अनेक सेवक सेवा बजावत. मात्र, त्यांची पार्श्वभूमी काय आहे ती बघीतली जात नाही. संजीव वैद्य हा गुन्हेगार नव्हता, पोलिसांनीच गुंडाप्रमाणे त्याचे अपहरण केल्याचा आरोप आश्रमातील सेवक रामभाई यांनी केला असून न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे.


तर अहमदाबादच्या क्राईम ब्रँच पथकाने संशयिताला अटक करण्याआधी किंवा नंतर नाशिक पोलिसांना माहिती देणे गरजेचे होतं. मात्र, ती माहिती दिली नसल्याने गोंधळ उडल्याचा नाशिक पोलिसांचा दावा आहे. नाशिकमध्ये या आधीही अनेक गुन्हेगार आश्रयासाठी आल्याचं तपासात निष्पन्न झालाय. यात शहराची हेरगिरी करणाऱ्यापासून तर खून दरोड्यातील आरोपींचा समावेश होता. या यादीत आणखी एका नावाची भर पडलीय. त्यामुळे नागरिकांनी, विविध आश्रमातील सेवकांनी सजग राहण्याची आणि पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन राबविण्याची गरज आहे.