नाशिक : राष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळची अटक टळली असून त्याला नाशिक जिल्हा न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 15 हजारांच्या जातमुचक्यावर दत्तूला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र आठवड्यातून एकदा दत्तूला नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.


यासोबत तक्रारदार महिलेला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचीही त्याला सूचना देण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी आज संध्याकाळी हा निकाल दिला. विशेष म्हणजे दत्तू भोकनळने आपण या महिलेसोबत लग्न केल्याच मान्य केलं असून ही महिला दत्तूची पत्नीच असल्याचं आता सिद्ध झालं आहे.


या निकालाचं दत्तूच्या वकिलांकडून स्वागत केलं जात असून आम्ही या अटी शर्तींचं पालन करु, असं सांगितलं. तर दुसरीकडे दत्तूला जामीन मंजूर झाल्याने तक्रारदार महिला नाराज झाल्याचं बघायला मिळत असून आम्ही महिला कायद्यानुसार दाद मागू, असं तक्रारदार महिलेच्या वकिलांनी म्हटलं आहे.


काय आहे महिलेची तक्रार?


महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, "2015 मध्ये दत्तूला आर्मीमध्ये मेडल मिळाल्याने चांदवडमध्ये गावकऱ्यांनी त्याचा सत्कार ठेवला होता. तेव्हा त्याची आणि माझी ओळख होऊन मैत्री झाली. काही दिवसांनी मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही दोघांनी डिसेंबर 2017 मध्ये पुण्याच्या आळंदीला जाऊन एका कार्यालयात हिंदू पद्धतीने लग्न केलं. मात्र याबाबत कुठेही वाच्यता न करता काही दिवसांनी दोघांकडच्या नातेवाईकांसमक्ष गावी लग्न करायचं आम्ही ठरवलं.


मात्र त्यानंतर आम्ही लग्न करणार असं आमच्या घरी सांगितलं. दोन वेळा लग्नाची तारीख ठरवून कार्यालय बुक करुनही, दत्तूने ऐनवेळी नकार दिला. त्याने मला 22 डिसेंबर 2017  ते 3 मार्च 2019 या काळात शारीरिक आणि मानसिक त्रास देत माझी फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे लग्नाबाबत विचारल्यास मी विष पिऊन आत्महत्या करेन, अशी धमकीही दत्तूने मला दिली.", असे त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.


कोण आहे दत्तू भोकनळ?


- दत्तू भोकनळ हा मूळचा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव-रोही या गावचा आहे.
- सैन्यात भरती झाल्यावर त्याने रोईंगला सुरुवात केली
- रोईंगमध्ये प्राविण्य मिळवत 2016 चं रिओ ऑलिम्पिक गाठलं
- रिओ ऑलिम्पिकमध्ये दत्तूने रोईंगच्या सिंगल स्कल्स प्रकारात गटात 6 मिनिटं आणि 54.96 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून 13 वं स्थान मिळवलं होतं.
- ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा दत्तू महाराष्ट्रातला पहिलाच रोईंगपटू ठरला.
- दत्तू भोकनळचा समावेश असलेल्या भारताच्या रोईंग चमूने 18व्या एशियाड गेम्समधील पुरुषांच्या कॉड्रापल स्कल्स प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.