नाशिक : जगातील अत्यंत खडतर सायकल स्पर्धा म्हणून मानल्या जाणाऱ्या 'रेस अॅक्रॉस अमेरिका' अर्थातच 'रॅम'मध्ये नाशिककरांनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. नाशिककरांनी अमेरिकेत भारताचा तिरंगा फडकवला आहे.
नाशिककर असलेले लेफ्टनंट श्रीनिवास गोकुळनाथ यांनी वैयक्तिक गटात जगातील सर्वात अवघड सायकल रॅली पूर्ण केली. गोकुळनाथ यांनी वैयक्तिक गटात जिंकलेले ते पहिले भारतीय ठरले आहेत. त्यांच्यासोबतच नाशिककर असलेले डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. संदीप शेवाळे आणि डॉ. रमाकांत पाटील तसेच मुंबईच्या पंकज मार्लेशा या चार जणांच्या टीमने सांघिक गट स्पर्धेत यश मिळवले आहे.
अमेरिकेत नाशिकसह देशाचं नाव उंचावणारे हे सर्व सायकलवीर मायदेशी परतल्यानंतर आज सकाळी नाशकात पाथर्डी फाटा परिसरात क्रीडाप्रेमींनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. हत्तीवर बसवून या सर्वांची ढोल ताशाच्या तालावर नाचत मिरवणूक काढण्यात आली.
अमेरिका खंडातील पश्चिम टोकापासून ही स्पर्धा सुरू होत पूर्वेच्या टोकाला ही संपते. एकूण 4 हजार 800 किलोमीटर अंतर पार करत ही स्पर्धा पूर्ण होते. यापूर्वी नाशिकच्या डॉ. हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन या बंधूंनी ही रॅम स्पर्धा पूर्ण करत नाशिकचे नाव सातासमुद्रपार पोहोचवले होते.