भरधाव कारच्या धडकेत नाशकात बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 20 Mar 2017 07:22 PM (IST)
नाशिक : नाशिकमध्ये भरधाव अल्टो कारच्या धडकेत बारावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघात प्रकरणी महिला कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारच्या धडकेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मनोज बाविस्कर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मनोजने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. तर त्याचा मित्र विशाल पालवे गंभीर जखमी झाला आहे. विशाल आणि मनोज नाशकातील आडगाव नाका परिसरात सोमवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास उभे होते. त्यावेळी भरधाव अल्टो कारने दिलेल्या धडकेत मनोज झाडावर फेकला गेला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू ओढावला. कारचालक राजश्री महाजन या महिलेविरोधात आडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.