नाशिक : नाशिक शहरात वाहतूक पोलिसांनी स्पेशल ड्राईव्ह राबवून दोनच दिवसात वाहनचालकांकडून तब्बल 28 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. हेल्मेट न घातल्यास प्रत्येकी पाचशे रुपयांची पावती फाडण्यात येऊन हेल्मेटविषयी पोलिसांकडून जनजागृती देखील करण्यात येत आहे.


पुण्यात एक जानेवारीपासून लागू करण्यात येणाऱ्या हेल्मेटसक्तीला विरोध होत आहे. त्याच वेळा नाशकात पोलिसांनी कायदे मोडणाऱ्या वाहनचालकांची धरपकड केली. यावेळी सर्वाधिक कारवाई हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांवर करण्यात आली.

नाशिकमधील वाहनचोरी, घरफोड्या आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी शुक्रवार आणि शनिवारी शहरातील मुख्य चौकांमध्ये स्थानिक पोलिस ठाणे आणि वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबवली.

नाशिक शहरात 45 हजार वाहनांची तपासणी करण्यात आली असून पाच हजार 620 बेशिस्त वाहनचालकांकडून तब्बल 28 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. हेल्मेट न घातल्याने दुचाकी चालकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत असून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट परिधान करा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.