नाशिक: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना धोबीपछाड देत भगवा फडकावला. शिवसेनेचे किशोर दराडे दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले.
किशोर दराडे यांना 24 हजार 369 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत टीडीएफचे उमेदवार संदीप बेडसे यांना 13 हजार 830 मतांवर समाधान मानावं लागलं. तर भाजपचे अनिकेत पाटील तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.
एक महिन्यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत किशोर दराडे यांचे मोठे बंधू नरेंद्र दराडे विजयी झाले होते. आज एक महिन्याच्या अंतराने एकाच घरात दोन आमदार झाले असून, दोघेही वरीष्ठ सभागृहात म्हणजेच विधानपरिषदेत दिसणार आहेत.
दोन भाऊ विधानपरिषदेच्या सभागृहात एकाच वेळी जाण्याची बहुदा पहिलीच वेळ आहे. याआधी दोघेही नाशिक जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात होते. दोघेही एकेकाळचे पैलवान असून, आता त्यांनी विधानपरिषदेचा राजकीय आखाडाही गाजविला. दोघांच्या विजयाने शिवसेनेची विधीमंडळातील ताकद वाढली आहे.
‘पैलवान हुशार असतो, ऐनवेळी डाव टाकतो’ अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे यांनी ‘एबीपी माझा’ला दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्रमधील सर्व मंत्री, आमदार, खासदार यांची बैठक घेऊन रणनीती आखली होती. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः नाशिकमध्ये येऊन आढावा घेतला होता. भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची करूनही भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्यानं, भाजप विषयीचा रोष मतपत्रिकेतून दिसून येत आहे.
तर दुसरीकडे पराभूत उमेदवार संदीप बेडसे यांनी हा ‘धनशक्ती’चा विजय असल्याची टीका केली. पैसे आणि पैठणी वाटल्याने समोरचा उमेदवार विजयी झाला. लोकशाहीचा हा पराभव आहे, असं संदीप बेडसे म्हणाले.
चार निकाल
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेनेच्या विलास पोतनीस यांनी बाजी मारली. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे कपिल पाटील यांनी विजयी हॅटट्रिक केली. तिकडे नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडेंनी मोठा विजय मिळवला.
संबंधित बातम्या
विधानपरिषद निकाल: शिक्षक आणि पदवीधर निवडणूक संपूर्ण निकाल
कोकण पदवीधर: 23 तासांनी निकाल, निरंजन डावखरेंचा विजय!
मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना, तर शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील विजयी